चार चाकीवर भरधाव दुचाकी आदळल्याने एकाचा मृत्यू; दुचाकी स्वरावर गुन्हा दाखल!

पिंपरी : भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने दुचाकी वरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणाला गतिरोधकावर दुचाकी वरील नियंत्रण राखता आले नाही त्यामुळे पुढे चाललेल्या वाहनावर जाऊन दुचाकी आदळली. यामुळे दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. अन्य दोघे जखमी झाले. ही घटना 19 मे 2026 रोजी रात्री सव्वा एक ते दीड वाजण्याच्या सुमारास वल्लभ नगर येथील गंधर्व बिर्याणी दुकानासमोरील एसटी बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

सोनू उर्फ अरबाज खान अख्तर खान (वय 33) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शशिकांत गाडेकर पोलीस उपनिरीक्षक, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे यांनी फिर्यादी दिली आहे. करीम रहीम शेख (वय 32, रा. पवार वस्ती, विठ्ठल मंदिर जवळ, दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे त्यांचे इतर दोन मित्रासह दुचाकी वाहन क्रमांक (एम एच 12/ वाय इ/ 93 63 )वरून ट्रिपल सीट जात होते. आरोपीचे मित्र सोनू उर्फ अरबाज खान अख्तर खान, सोहिल नईम सय्यद यांच्यासह भरधाव व निष्काळजीपणाने वल्लभनगर बस स्थानकाजवळील गंधर्व बिर्याणी दुकानासमोरील गतिरोधकाजवळ आले. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचा वेग ज्यादा असल्याने त्यांना दुचाकी नियंत्रित करता न आल्याने आरोपीचा दुचाकी वरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनास जाऊन धडक दिली. त्यामुळे दुचाकी वरील तिघेही जमिनीवर खाली पडून गंभीर जखमी झाले. यामध्ये आरोपी मित्र सोनू उर्फ अरबाज खान अख्तर खान (वय 33) याच्या मृत्यूस कारणीभूत झाला. त्याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार करण्यात आली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गाडेकर हे तपास करत आहेत.

