अठरा वर्षापासून मोका गुन्ह्यातील वॉरंट मधील सराईत फरार आरोपी जेरबंद!

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट (चार) ची कामगिरी
पिंपरी : खून, बलात्कार, खंडणी, किडनॅपिंग, मारामारी, अग्निशस्त्राचा वापर असे गंभीर गुन्हे दाखल असलेला मोका गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अठरा वर्षानंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चार ने जेरबंद केले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे.

सराईत गुन्हेगार आरोपी मोहशीन हमीद मुलानी (वय 41, रा. इंदोरी, ता. मावळ) हा गेली 18 वर्ष फरार होता. या आरोपीवर 2008 मध्ये निगडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 3037/ 2008 मधील गुन्ह्यामध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मोका कोर्ट यांच्याकडील केस क्रमांक 1999 /100004/2008 मधील अजामीनपात्र वॉरंट हा कित्येक वर्ष फरार होता. या आरोपीवर खून, बलात्कार, खंडणी, किडनॅपिंग, मारामारी, अग्निशस्त्राचा वापर असे गंभीर गुन्हे दाखल आहेत .आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना केल्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट चार कडील पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणात्मक तपास करून गोपनीय बातमीद्वारा माहिती काढून आरोपीस पनवेल येथून तपास पथकाने शिताफिने ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश, मोका कोर्ट पुणे येथे हजर केले. न्यायालयाने सदर आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहायुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे (एक) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे- पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलिस अंमलदार अमोल बोराटे, गणेश महाडिक, अमोल माटे, तांत्रिक विश्लेषक त्रिनयन बाळसराफ, नागेश माळी यांच्या पथकाने केली.

