सांगवी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कारवाई!

पाच डीजे मिक्सर, 3 डीजे, एक लाईट कंट्रोल मशीन, तीन लॅपटॉप, डीजे सेट (ट्रॅक्टर ट्रॉली स्पीकर सह) जप्त
पिंपरी : सांगवी परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत 9 ते 10 गणेश मंडळांनी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी, साऊंड सिस्टिम लावून ध्वनी प्रदूषण केल्याचे आढळून आल्याने एकूण पाच डीजे मिक्सर, 3 डीजे कन्सिल, एक लाईट कंट्रोल मशीन, तीन लॅपटॉप, एक स्पीकर, एक डीजे शेट (ट्रॅक्टर ट्रॉली व स्पीकर सह) मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सदर मंडळावर व डीजे मालक चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे संदीप आटोळे यांनी दिली आहे.

पोलीस उपायुक्त आटोळे यांनी सांगितले की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये 9 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी, साऊंड सिस्टिम व ध्वनी प्रदूषण करणारी साधने वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जारी केले असून त्याबाबत वेळोवेळी पोलिसांनी स्वतः व वरिष्ठांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांसोबत मीटिंग घेऊन त्यांना लेखी स्वरूपात सूचना दिल्या होत्या. तरीदेखील काही गणेश मंडळांनी या आदेशाचा भंग केला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमधील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणत्याही गणेश मंडळाने उच्च क्षमतेचे डीजे. डॉल्बी. साउंड सिस्टिम लावून ध्वनी प्रदूषण करू नये. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कोणतीही पूर्व सूचना न देता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टिम, डीजे मिक्सर, डीजे कन्सिल जप्त करण्यात येतील. यास मंडळाचे पदाधिकारी व आयोजक स्वतः जबाबदार राहतील असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौब, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक गुन्हे नांदेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळेगावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराडे ,पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलीस उपनिरीक्षक अकमवाड, पोलीस उपनिरीक्षक बाराते, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या पथकाने केली.

