फायनान्स कंपनीने सील केलेल्या ऑफिस मध्ये अनधिकृत प्रवेश!

पिंपरी : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीने सील केलेल्या दोन ऑफिसचा कडीकोंडा आणि कुलूप तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा प्रकार चऱ्होली बुद्रुक येथे समोर आला आहे. तनिष्क ऑर्चिड इमारतीत 23 ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला.

याबाबत विश्वानंद अशोक कानडे (वय 36, रा. धायरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. मनोज रमेश पाटील (वय 45, रा. बोपखेल), सपना अशोक पाटील (वय 32, रा. बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मालमत्ता फायनान्स कंपनीने कायदेशीर प्रक्रिया अंतर्गत ताब्यात घेऊन सील केली होती. कार्यालयांना कुलूप लावण्यात आले होते. मात्र आरोपींनी संगणमत करून फायनान्स कंपनीचे सील आणि कुलूप तोडले. त्यानंतर दुकानात बेकायदेशीरपणे प्रवेश करून मालमत्तेचे नुकसान केले आहे. दिघी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

दुचाकीला अडकवलेली दोन लाखाची रोकड लंपास!
पिंपरी : बँकेतून काढलेली दोन लाख रुपयांची रोकड दुचाकीला अडकवलेल्या पिशवीत ठेवून नातेवाईकांशी बोलत थांबलेल्या व्यक्तीची नजर चुकवून चोरट्याने पिशवी लंपास केली. सुंबरेनगर येथील संतोष हॉटेल जवळ शनिवार 19 सप्टेंबर रोजी घटना घडली.
याबाबत सुनील तुकाराम कारले (वय 57, रा. चांदुसगाव, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पांढऱ्या रंगाचा शर्ट व राखाडी पँट घातलेल्या एका अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीने बँकेतून दोन लाख रुपये काढले होते. रोकड आणि पासबुक एका पिशवीत ठेवून ती दुचाकीच्या शीट खालील हुकला अडकवली. त्यानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला पार करून ते नातेवाईकाशी शेतीच्या पेरणी बाबत बोलत होते. ही संधी साधून आज्ञात चोराने 500 रुपयांच्या नोटांचे बंडल असलेली पिशवी चोरून नेली. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे. चाकण उत्तर पोलीस तपास करत आहेत.

