चोरीची रक्कम बँक खात्यात वळवून तरुणाची फसवणूक!

पिंपरी : ओला- उबेरचा व्यवसाय करण्यासाठी बँक खाते आणि सिम कार्ड आवश्यक असल्याचे सांगून तरुणाचे खाते घेतले. त्यानंतर त्या खात्यात सायबर फसवणूक आणि चोरीची रक्कम स्वीकारून एका तरुणाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 20 जुलै ते 18 सप्टेंबर या कालावधीत पिंपरी परिसरात घडला.

याप्रकरणी धम्मशील अशोक सातपुते (वय 23, रा. चिखली, मूळ -रा. केज, जि. बीड) यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन श्रावण वाघमारे (वय 24, रा. केज, जि. बीड), रोहन चाळक (वय 24, रा. केज, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित वाघमारे यांनी ओला -उबेर व्यवसायासाठी बँक खाते व सिम कार्डची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने स्वतःच्या नावाने सिमकार्ड तसेच सीएसबी बँकेत खाते काढून त्याचे पासबुक, चेक बुक आणि एटीएम कार्ड दिले. त्यानंतर दोन्ही संशयतांनी संगममत करून या खात्यात सायबर फसवणूक व चोरीतील रक्कम स्वीकारून फिर्यादीची फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहे.

