56 लाखाचा गुटखा जप्त! शिरगाव- परंदवडी पोलिसांची उर्से टोल नाक्यावर कारवाई!

शिरगाव- परंदवडी पोलीस ठाण्याची कारवाई
पिंपरी : व्हर्मी कंपोस्ट खताच्या गोण्यांचा आडोसा घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने नेण्यात येत असलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा शिरगाव -परंदवडी पोलिसांनी मोठी कारवाई करून 56 लाख 83 हजार दोनशे रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू आणि टेम्पो सह एकूण 79 लाख ४६३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी टेम्पोचालक अमजुद्दीन एनुलहक चौधरी (रा. माखली, बंगळुरू, कर्नाटक, मूळ- रा. त्रिपुरा) याला अटक करण्यात आली आहे .न्यायालयाने त्याला 17 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिरगाव- परंदवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना शनिवार 12 सप्टेंबर रोजी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरून होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी उर्षे टोल नाका परिसरात रात्री सव्वा अकराच्या सुमारास नाकाबंदी करून संशयित वाहनाचा शोध सुरू केला. काही वेळाने लाल रंगाचा आयशर टेम्पो ( केए 52 सी, 6756 ) पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी टेम्पो थांबवून चालकाकडे चौकशी केली. त्याने वाहनात व्हर्मी कंपोस्ट खत असल्याचे सांगितले.

मात्र त्याच्या हालचाली संशय संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली. तपासणी दरम्यान पांढऱ्या पोत्यांमध्ये ठेवलेले मोठे बॉक्स आढळले. ते उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये रजनीगंधा गुटखा आणि तुलसी सुगंधी तंबाखूचा साठा असल्याचे स्पष्ट झाले. गुटख्याची वाहतूक उघड होऊ नये यासाठी टेम्पोमध्ये व्हर्मी कंपोस्ट खताच्या गोण्याही ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी 42 लाख 43 हजार दोनशे रुपयांचा रजनीगंधा गुटखा, 14 लाख 40 हजार रुपयांची तुलसी सुगंधी तंबाखू, दोन लाख 63 हजार 120 रुपयांचे व्हर्मी कंपोस्ट खत, आणि वीस लाख रुपयांचा आयशर टेम्पो जप्त केला.
पोलिसांनी या कारवाईनंतर गुटख्याचा साठा कुठून आणण्यात आला आणि तो कोणाकडे पोहोचविण्यात येणार होता. या वाहतुकी मागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास शिरगाव- पुरंदवडी पोलिसांनी सुरू केला आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. शिरगाव- परंदवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सपकाळ, पारखे तपास करीत आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळ, अशोक केंद्रे, प्रकाश पारखे, अमोल गोरे, किशोर गिरीगोसावी, सचिन काचोळे, सुरेश परदेशी, प्रसाद जंगीलवाड, दिलीप राठोड, शिवानंद चव्हाण, सागर कोळी, शुभम राजगुरे आणि रामेश्वर जाधवर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

