फोटोची भीती दाखवून 97 लाखाचे दागिने लांबविले;एकास अटक
पिंपरी : दोघांचे एकत्र असलेले फोटो कुटुंबीयांना दाखवून समाजात बदनामी करण्याची धमकी देत 24 वर्षीय महिलेला सातत्याने ब्लॅकमेल करण्यात आले. या माध्यमातून महिलेकडून तब्बल 97 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेब्रुवारी ते जुलै 2026 या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावेश प्रदीप लखवाणी (वय 25, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीला फोन करून जबरदस्तीने अशोक थिअटर परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर दोघांचे एकत्र असलेले फोटो कुटुंबीयांना दाखवून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत रोपीने फिर्यादीला वारंवार ब्लॅकमेल करून 97 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने बळकावलेचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

तरुणाच्या बँक खात्यातून ऑनलाइन एक लाख रुपये पळवले!
पिंपरी : तरुणाच्या दोन बँक खात्याचा अनधिकृत ऑनलाईन ॲक्सेस मिळवून त्यातील एक लाख तीन हजार रुपयाहून अधिक रक्कम दुसऱ्या खात्यावर परस्पर वळविण्यात आली. भुकूम येथे ८ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.
किशोर गणपत सूर्यवंशी (वय 25, रा. भुकूम, ता. मुळश, मुळगाव- रा. सोयगाव, छत्रपती संभाजी नगर) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बावधन पोलिसांनी राजस्थानातील दोघांना अटक केली आहे. अशोक कुमार निंबाराम जाखड (वय 25), अर्जुन हिरामण अहलावत (वय 21, दोघे रा. जोधपुर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमर वैजनाथ वाघमारे आणि मनीष कुमार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या रूमवर असताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यातून 93 हजार रुपये आणि एचडीएफसी बँकेच्या खात्यातून १० हजार ५८२ रुपये दुसऱ्या खात्यावर हस्तांतरित झाल्याचे संदेश त्यांना आले. आरोपींनी फिर्यादीच्या दोन्ही बँक खात्याचा अनधिकृत ऑनलाईन ॲक्सेस मिळवून ही रक्कम परस्पर वळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.

