Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

स्टार बाजारातून काजू-बदाम तूप चोरणारी टोळी जेरबंद; चार महिलासह सात जणांना अटक!

स्टार बाजारातून काजू-बदाम तूप चोरणारी टोळी जेरबंद; चार महिलासह सात जणांना अटक!

पिंपरी : सुपर मार्केटमध्ये ग्राहक बनवून जायचे आणि तूप, काजू, बदाम यासारख्या महागड्या वस्तूंवर डल्ला मारायचा अशा प्रकारे चोऱ्या करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. चार महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

रविकांत देवानंद जाकरे (वय 32), ब्रिजेश सिताराम मदेशिया (वय 27), ब्रिजेश बाळू यादव (वय 37), सानिया बाबुमिया शेख (वय 20), रोमा ब्रिजेस मदेशिया (वय 27), सोनम बाबू शेख (वय 37, सर्व रा. जोगेश्वरी ईस्ट मुंबई) आणि सलमा शकील शेख (वय 71, रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड, पिंपरी, चिखली तसेच पुणे परिसरातील स्टार बाजार मध्ये या टोळीने चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले आहे. वाकड येथील दत्त मंदिर रोडवरील स्टार सुपर मार्केट मध्ये 29 ऑगस्ट रोजी, कलाटे वस्ती येथील स्टार बाजार सुपर मार्केट मध्ये 12 ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. दोन्ही ठिकाणाहून 42 हजार 100 रुपये किंमतीचे गोवर्धन तूप, काजू, बदाम आदी साहित्य चोरीला गेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण केले. गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार मुंबईच्या दिशेने गेल्यानंतर पुन्हा पिंपरी चिंचवड परिसरात आल्याचे उघड झाले. त्यानुसार ताथवडे, वाकड परिसरात सापळा रचून पोलिसांनी इनोव्हा कार आणि एक रिक्षा ताब्यात घेतली. वाहनातील संशयितांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पिंपरी आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्टार बाजार मध्ये अशाच पद्धतीने चोऱ्या केल्याची कबुली दिली. पिंपळे सौदागर आणि वाघोली केसनंद फाटा येथील स्टार बाजार मधूनही काजू बदाम आणि तुपाचे पाऊच चोरल्याचे तपासात समोर आले आहे .आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून मुंबई, पुणे पिंपरी, चिंचवड सह महाराष्ट्रातील अन्य भागातही त्यांनी अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"