जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर हल्ला; एकास अटक

पिंपरी : जुन्या भांडणाच्या वादातून जमाव जमवून एका तरुणावर धारदार शस्त्र आणि लोखंडी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. डोक्यात हातावर आणि पायावर वार करून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. ही घटना रविवार दिनांक 30 ऑगस्ट रात्री साडेसातच्या सुमारास बोपखेल येथील दुर्गा माता मंदिर, गणेश नगर रोड येथे घडली.

याप्रकरणी तुषार प्रकाश डोंगरे (वय 23) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपचंद यादव (वय 25, रा. बोपखेल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अनुज घोंगडे (वय 20), पियुष रोकडे (वय 25), मयंक उर्फ मडू आणि इतर दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगनमत करून फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांना हत्यारे दाखवत कोणी मध्ये आले तर कोणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली. हवेत हत्यारे फिरवत आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही असे म्हणत दहशत निर्माण केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

