शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी!

पिंपरी : वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून शिल्पा सचिन गवारे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेविकास स्नेहा कलाटे यांना फोन करून कलाटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. आरोपींना कठोर कारवाईची शिक्षा व्हावी अशी मागणी कलाटे कुटुंबीयांनी यावेळी केली. हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील देण्यात येईल तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
पती सचिन उत्तम गवारे, सासरा उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे, दीर संदीप उत्तम गवारे अशी अटक आरोपींची नावे आहेत. सचिन गवारे यांच्यावर 2006 मध्ये निगडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. लग्नाच्या वेळी गवारे कुटुंबीयांनी गुन्ह्याची पार्श्वभूमी कलाटे कुटुंबीयांपासून लपवून ठेवली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कलाटे कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. मात्र शिल्पा आणि सचिन यांचा विवाह झालेला असल्याने त्यांनी पुढे कोणतीही पावले उचलली नाहीत.
विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोर्हे यांनी शुक्रवारी वाकड पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. आरोपीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असली तरी कोणताही दबाव चालणार नाही. या प्रकरणावर माझी लक्ष राहणार आहे आहे असे गोरे म्हणाल्या.

