आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने साधूने सोन्याची अंगठी केली लंपास!

पिंपरी : आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने फसवून एका साधूने एका व्यक्तीची सोन्याची अंगठी लंपास केली. शनिवार 22 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्ता ते एचडीएफसी बँक, पूर्णा नगर ,चिंचवड दरम्यान घडली.

याप्रकरणी अभिजीत रामचंद्र पाटील ( वय 49 ,अक्षय चंदन सोसायटी, थेरगाव) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात साधू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे कार मधून जात असताना एका अनोळखी साधने त्यांना लिफ्ट मागितली. कार मध्ये बसल्यानंतर त्याने स्वतःला नागा साधू असल्याचे सांगून आपल्या आशीर्वादामुळे सुख समृद्धी मिळेल असे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून साधूने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेण्यास सांगितले. सदर अंगठी डोळ्यांना लावून पुन्हा कारच्या गिअर शिफ्ट जवळ ठेवण्याचे नाटक करून साधूने ती स्वतःजवळ ठेवली आणि तेथून पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी साधूचे वय अंदाजे पन्नास वर्षे असून उंची सुमारे साडेपाच फूट, रंग सावळा असून अंगात भगवे वस्त्र, डोक्यावर फेटा आणि हातात मोठे कडे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.

