गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देण्याचे अमीष; 64 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : भारतातून खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या प्रसिद्ध कंपनी मध्ये गुंतवणूक केल्यास 20 महिने प्रतिमाह दहा टक्के परतावा देऊ असे अमीष दाखवून फिर्यादी व अन्य गुंतवणूकदारांची 64 लाख 85 हजार 348 रुपयांची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक केली. ही घटना जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत ग्रो कॅपिटल कंपनीचे कार्यालय ,ऑफिस क्रमांक 142, जी ब्लॉक, जय गणेश साम्राज्य, गोडाऊन चौक, भोसरी या ठिकाणी घडली.

याप्रकरणी विकी अशोक हनुमंते (वय 41, रा. सर्वे नंबर 111/5/7, विजयनगर मेन रोड वैभव कॉलनी, अभिनव आर्ट शेजारी, काळेवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोज अशोक पाटील (वय 46, रा. शोभा पाटील, शारदा मूकबधिर, नालवाडी, जि. वर्धा), महिला आरोपी (वय 40, नंबर पाच, भोला मंदिर, एलआयसी कॉलनी, नालवाडी, जि. वर्धा), महिला आरोपी (वय अंदाजे 44, रा. क्रांतिवीर कॉलनी, पंढरी निवास, काळेवाडी, पुणे), दिगंबर दत्ताराव सूर्यवंशी (वय 42, ता.जि. संभाजीनगर )अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एक ते चार यांनी ग्रो कॅपिटल नावाची कंपनी आणि विश्वांजली व्हेंचर्स एलएलपी या खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीमध्ये एक लाख रुपये गुंतवणूक केल्यास 20 महिने दहा टक्के दराने नफा देणार आहोत असे आमिष दाखवून फिर्यादीला ऑफिस नंबर 142, जी ब्लॉक, जय गणेश साम्राज्य, गोडाऊन चौक येथे बोलावून फिर्यादी कडून व इतर गुंतवणूकदार यांच्याकडून ऑनलाइन व रोखीने एकूण 84 लाख 51 हजार 688 रुपये घेऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या गुंतवणुकीवर 19 लाख 66 हजार 340 रुपये परतावा म्हणून मूळ रकमेतून देऊन फिर्यादी व इतर गुंतवणूकदार यांची 64 लाख 85 हजार 348 रुपयांची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घेऊन फिर्यादी व अन्य गुंतवणूकदारांची फसवणूक केली. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार दगडगावे, सह पोलीस निरीक्षक हर्षदा पाटील या तपास करत आहेत.

