प्रेम संबंधातील मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या!

पिंपरी : प्रेम संबंधातील संशयावरून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 27 जुलै रोजी चिंचोली येथे घडली .

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साहिल हनुमंत दनाने (वय 21, रा. लक्ष्मीनगर, झेंडे मळा, देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी तिचे आजी-आजोबाकडे राहत असताना आरोपी साहिल हनुमंत दनाने याने फिर्यादीच्या मुलीला फोनवरून बोलून तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यानंतर तिच्यावर संशय घेऊन तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या तणावातून अल्पवयीन मुलीने घरातील साडीच्या साह्याने किचन मधील पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. 21 वर्षीय तरुणाने मानसिक त्रास दिल्याने मुलीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे तपास करत आहेत.

