पाच कोटीच्या खंडणीची लॉरेन्स विष्णोई टोळीच्या नावाने मागणी!

पिंपरी : आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून फोन करून पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी वाकड येथील उच्चभ्रू पार्क स्ट्रीट सोसायटीत राहणाऱ्या एका उद्योजकाच्या पत्नीला करण्यात आली. खंडणी दिली नाही तर तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारू अशी धमकी विष्णोई टोळीच्या नावाने देण्यात आली. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासात सुरुवात केली आहे.

यापूर्वी रावेत आणि नेहरूनगर परिसरातील काही व्यावसायिकांना विष्णोई यांच्या नावाने खंडणीचे फोन आले होते. खंडणी न दिल्याने संबंधितांच्या आस्थापनांवर गोळीबार झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या मोबाईल फोन वरून विष्णोई टोळीनेच केला आहे की, अन्य त्यांच्या नावाचा गैरवापर करून धमकी आणि खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे पती स्टील व्यवसायाशी संबंधित असून त्यांचे तळेगाव येथे गोदाम आहे. सध्या हे व्यावसायिक कामानिमित्त दुबई येथे गेले असून गुरुवारी प्रथम त्यांच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर अर्ध्या तासात वाकड येथे राहणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवरही अशा स्वरूपाचा धमकीचा फोन आला. खंडणीची रक्कम तातडीने देण्याची मागणी फोन करणाऱ्याने केली आहे. अन्यथा संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात येईल अशी धमकी देखील दिली आहे. संबंधित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

