मुलींची छेड काढली असल्याचा बनाव करुन केली खंडणी वसूल!

पिंपरी : मुलींची छेड काढली असून त्या मुली माझ्याकडे आल्या आहेत. दोन लाख रुपये दे अन्यथा पोलिसात तक्रार करण्यास सांगतो अशी धमकी केटरिंग व्यावसायिकाला देऊन चौघा जणांनी केटरिंग व्यावसायिकाला जबरदस्तीने रिक्षात पळवून नेऊन मारहाण केली. शिवाय 55 हजार 950 रुपये खंडणी घेतली. ही घटना 20 मे ते 25 जून 2026 या कालावधीत वाकी खुर्द, ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत दामोदर अगंद यादव (वय 36, रा. सुरेश जाधव यांचे खोलीत, वाकी, मुळगाव- धूनकौर, पो. पहाडी पारगाव, ता. धारूर, जि. बीड) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सनी वैजिनाथ उघडे (वय 19, रा. राहुल चौक, राजगुरुनगर), अनिकेत पुरुषोत्तम ढोले (वय 21, रा. सरगम हॉटेल, राजगुरुनगर, ता. खेड), रवी संतोष परघरमोल (वय 18, रा. सरगम हॉटेल, राजगुरुनगर), प्रेम गिरीश अंकुश (वय 21, तेली आळी ,ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून सांगितले की, तू दोन मुलींची छेड काढली असून सदर मुली माझ्याकडे आल्या आहेत. मी त्यांना पोलिसात तक्रार करायला लावत नाही. त्याकरिता मला दोन लाख रुपये द्यावे लागतील. परंतु फिर्यादीने त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे आरोपीला पैसे देऊ शकला नाही.
आरोपींनी फिर्यादीला वेळोवेळी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. हॉटेलमधील चौदाशे पन्नास रुपये बिल जबरदस्तीने भरण्यास सांगितले. दोन लाख रुपये दिले नाहीत म्हणून आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी फिर्यादीस रिक्षातून जबरदस्तीने उचलून नेऊन बेल्ट व हाताने मारहाण केली .तरी देखील पैसे दिले नाहीत म्हणून धारदार शास्त्राची भीती दाखवून दोन लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीकडे पैसे नसल्याने आरोपींनी फिर्यादीस केटरिंग कस्टमर यांच्याकडे नेऊन त्यांच्याकडून आरोपी क्रमांक एक याने 45 हजार रुपये रोख व स्कॅनरवर ऑनलाइन एकूण 10 हजार 950 रुपये खंडणी म्हणून घेतले . तसेच फिर्यादीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल नंबर (एम एच 14/ एनसी /1636 ही दुचाकी आरोपींनी फिर्यादी कडून जबरदस्तीने काढून नेऊन आणखीन खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कदम हे तपास करत आहेत.

