फक्त मुद्द्याचं!

5th June 2026
पिंपरी-चिंचवड

दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा शुभारंभ!

दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा शुभारंभ!

दरवर्षीप्रमाणे घेतली जास्तीत जास्त झाडे लावण्याची शपथ; पाच लाख देशी वृक्ष लागवडीचा संकल्प
पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराचे वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडी सारख्या विविध ठिकाणी पाच लाख झाडे लावून ती जगविण्याचा निर्धार आज महापालिकेने केला आहे, यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

viara vcc
viara vcc

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुर्गाटेकडी येथे मान्यवरांच्या हस्ते १,००० देशी रोपांची लागवड करून ‘हरित पिंपरी-चिंचवड शहर’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला,त्यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते.

या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे,आमदार अमित गोरखे, उमा खापरे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे,नगरसदस्या शैलजा मोरे, अरूणा लंगोटे,नगरसदस्य कुशाग्र कदम, नीलेश नेवाळे, अमित गावडे, निलेश तरस,अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, मनोज सेठीया यांच्यासह भारतीय लष्कराचे ब्रिगेडीअर प्रकाश भारती, कर्नल अनिल फाटक, पोलीस उपआयुक्त विक्रम देशमुख, जुन्नर येथील वृक्षमित्र प्रकाश करमाळे,सामाजिक कार्यकर्ते अमोल भोंडवे, प्रा.नामदेव जाधव यांच्यासह नागरिक, पर्यावरण प्रेमी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, झाडांची केवळ लागवड करणे पुरेसे नाही, तर त्यांची योग्य निगा राखणे आणि त्यांना जगविणे हे प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकीतून शहर स्वच्छ ठेवणे, कचरा न करणे आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी देखील आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, दुर्गा टेकडी हे केवळ एक उद्यान नसून पिंपरी चिंचवड शहराचे अमूल्य नैसर्गिक रत्न आहे. ‘दुर्गा’ या नावातच सामर्थ्य आणि ऊर्जा दडलेली असून ही टेकडी नागरिकांना सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा आणि निसर्गाशी जोडणारी महत्त्वाची जागा आहे. या टेकडीचे वैभव घडविण्यात अनेक घटकांचे योगदान आहे. तिचे पावित्र्य, स्वच्छता आणि नैसर्गिक संतुलन राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. दुर्गा टेकडीला देशपातळीवर एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. त्याचबरोबर यावर्षी शहरातील वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यावेळी आमदार अमित गोरखे , आमदार उमा खापरे यांनीही मार्गदर्शन केले.

दुर्गादेवी टेकडीच्या उभारणीतील शिल्पकारांचेही करण्यात आले स्मरण
निगडी येथील ओसाड आणि खडकाळ टेकडीचे रूपांतर आजच्या नयनरम्य ‘दुर्गादेवी टेकडी उद्यानात’ करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पहिल्या पिढीतील शिल्पकारांच्या योगदानाचाही यावेळी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यात आला. महानगरपालिकेचे पहिले प्रशासक हरनामसिंग, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंढे आणि तत्कालीन मुख्य उद्यान अधीक्षक शांताराम भोंडवे यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रमांमुळेच हे विस्तीर्ण हरित वैभव उभे राहिले. त्यांनी केवळ प्रशासकीय जबाबदारी म्हणून नव्हे, तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या टेकडीवर लाखो वृक्षांचे जतन करून शहराला ऑक्सिजन हब मिळवून दिला. त्यांच्या याच ऐतिहासिक कार्याचा वारसा पुढे चालवत महापालिकेने आता ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

उपस्थितांनी घेतली माझी वसुंधरा शपथ?
“आम्ही भारताचे सुजाण नागरिक शपथ घेतो कि, आम्ही या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला,या पर्यावरणाला आमच्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ, या देशाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी आम्ही कटीबध्द राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम आम्ही करणार नाही, जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू” अशी शपथ यावेळी सर्व उपस्थितांनी घेतली. शपथेचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"