विषारी दारू दुर्घटनेनंतर पोलिसांची हातभट्टी दारु विक्री विरोधात मोहीम!

पिंपरी : फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून विशेष कारवाई सुरू केली आहे. विशेष मोहिमेअंतर्गत तब्बल 23 कारवाया करण्यात आल्या .यामध्ये दोन लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून 28 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर महाळुंगे, तळेगाव एमआयडीसी, दापोडी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी, उत्तर चाकण, बावधन, भोसरी एमआयडीसी, वाकड, निगडी, संत तुकारामनगर आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आल्या. आरोपींमध्ये सहा महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी एकूण एक लाख 97 हजार रुपये किंमतीची दारू जप्त केली आहे, भाटनगर परिसरात एका आरोपीने घरातील किचनमध्ये दारूचा साठा लपवून ठेवला होता. पोलिसांनी हा साठा जप्त केला आहे. चिंचवड मधील दळवी नगर झोपडपट्टी येथे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहताच दारू विक्री करणारी महिला पसार झाली. पोलिसांनी तिची ओळख पटवली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पोलिसांनी हातभट्टी दारू विक्री विरोधात आणि उत्पादन करणाऱ्याविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. यामुळे दारूचे काही अड्डे बंद झाले आहेत. मात्र याचा फायदा काही विक्रेते देशी व विदेशी दारू विक्री करण्याकरिता घेत आहेत. अनेक ठिकाणी देशी दारू बेकायदेशीररित्या विक्री केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात ज्या ठिकाणाहून विक्रीसाठी हातभट्टी दारू आणली जाते त्यावर देखील नियंत्रण ठेवण्याची पोलिसांना गरज आहे.
अवैध दारू व्यवसायाच्या उच्चाटनासाठी गुन्हे शाखेच्या वतीने स्वतंत्र दारूबंदी पथक तयार करण्यात आले आहे. कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू धंदे आहेत याची माहिती हे पथक घेणार आहे. त्यामुळे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे धंदे सुरू आहेत त्या पोलिसांवर देखील हे पथक आता नजर ठेवणार आहे.

