केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य!

मोठ्या आस्थापनांवर कचऱ्याचे विलगीकरण व परिसरातच प्रक्रिया बंधनकारक
पिंपरी : शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर्स (बीडब्ल्यूजी) यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) केंद्रीकृत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून, नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या निवासी संकुले, हॉटेल्स, मॉल्स, शैक्षणिक संस्था, रुग्णालये तसेच व्यावसायिक आस्थापनांसाठी सीपीसीबी पोर्टलवरील नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. या माध्यमातून कचरा निर्मिती, विलगीकरण आणि प्रक्रियेवर केंद्रीकृत पद्धतीने देखरेख ठेवली जाणार आहे. सीपीसीबीचे केंद्रीकृत घनकचरा व्यवस्थापन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून सर्व पात्र बल्क वेस्ट जनरेटर्सनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, शहरातील स्वच्छता आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांनी स्वतःच्या परिसरात कचऱ्याचे विलगीकरण व प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सीपीसीबी पोर्टलवरील नोंदणी ही कायदेशीर जबाबदारी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल.
महापालिकेचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, महापालिकेकडून संबंधित आस्थापनांना नोंदणी आणि कचरा व्यवस्थापन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. मात्र, निर्धारित कालावधीत नोंदणी न करणाऱ्या तसेच घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन न करणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर्सवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
खालील संकेतस्थळावर करा नोंदणी
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर https://uatswm.cpcb.gov.in/ जाऊन संबंधित आस्थापनांनी तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

