पत्नीशी फोनवर बोलल्याने एका व्यक्तीवर चाकूने वार; एकास अटक!

पिंपरी : पत्नीशी फोनवर का बोलतो म्हणून एका व्यक्तीच्या डाव्या पायाच्या मांडीवर व पोटाच्या डाव्या बाजूला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवार 17 मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास रा. सनव्हीव ऑटमेंट, शिंदे पेट्रोल पंपाजवळ, विकासनगर, किवळे येथे घडली.
याप्रकरणी निलेश बाबासाहेब साठे (वय 34, रा. फ्लॅट नंबर सात, सनव्हिव अपार्टमेंट, विकासनगर, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .विक्रांत काशिनाथ कुसळे (वय 31, फ्लॅट नंबर नऊ, सनव्हीव अपार्टमेंट, विकास नगर किवळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी हे एकाच बिल्डिंग मध्ये राहत असून सनव्हिव अपार्टमेंट बिल्डिंगच्या टेरेसवर फिर्यादीला बोलावून माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतो असे म्हणून आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या मांडीवर व पोटाच्या डाव्या बाजूला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड हे तपास करत आहेत.

महिलेच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले!
पिंपरी प्राधिकरण सेक्टर नंबर 25 निगडी येथील जिग्गर व्यास यांच्या बंगल्यासमोर पती-पत्नी व नातू असे पायी चालत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. ही घटना सोमवार 18 मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जिग्गर व्यास यांचे बंगल्यासमोर सेक्टर नंबर 25 प्राधिकरण येथे घडली.
याबाबत एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तीं विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिगर व्यास यांच्या बंगल्यासमोर फिर्यादी महिला आपल्या पती व नातू यांच्या समवेत पायी चालत असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकी मोटरसायकल वरून दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. दुचाकी मोटरसायकल वरील मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत 1 लाख 25 हजार रुपये जबरी हिसका मारून चोरून नेले. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी हे तपास करत आहेत.

