शिवीगाळ करण्यास विरोध केल्याने हॉटेल चालकाला मारहाण!

दोन आरोपींना अटक
पिंपरी : हॉटेलमध्ये शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींना हॉटेलमधून निघून जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करून फिर्यादीच्या पतीला काचेची बाटली डोक्यात, मानेवर, कमरेवर मारून जखमी केले. ही घटना शनिवार 16 मे रोजी सांयकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास करंजविहीरे गावच्या हद्दीत साई सिद्धी हॉटेल, ता. खेड येथे घडली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे .

याबाबत एका 28 वर्षीय महिलेने (तुळजाभवानी पेट्रोल पंपा समोर, करंजविहिरे, ता. खेड) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .शांताराम धोंडीबा नवले (वय 41, रा. वाहगाव, ता. खेड), दिनेश ज्ञानेश्वर जाधव (वय 39, वाहगाव, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये शिवीगाळ केली असता फिर्यादी यांनी त्यास शिवीगाळ करण्यास रोखून हॉटेल मधून निघून जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली व फिर्यादीचे पतीला काचेची बाटली डोक्यात, मानेवर, कमरेवर मारून गंभीर जखमी केले. उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महाडिक हे तपास करत आहेत.

