फक्त मुद्द्याचं!

13th May 2026
देश विदेश

शून्य सावलीच्या विशेष निरीक्षण कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव!

शून्य सावलीच्या विशेष निरीक्षण कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव!

पिंपरी : खगोलशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि कुतूहलजनक घटना असलेल्या ‘शून्य सावली’ दिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण, चिंचवड येथे दि. १३ मे २०२६ रोजी शून्य सावलीच्या विशेष निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थी व विज्ञानप्रेमी नागरिक भर दुपारी सायन्स पार्कच्या प्रांगणात उत्साहाने सहभागी झाले व या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

viara vcc
viara vcc

पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा अथवा परिभ्रमण होत असताना उत्तरायण व दक्षिणायन दरम्यान विशिष्ट अक्षांशावर सूर्य बरोबर डोक्यावर येतो, ज्यामुळे काही क्षणांसाठी पृथ्वीवरील त्या ठिकाणी असलेल्या वस्तूची सावली शून्य होते. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हा दुर्मिळ योग दि. १३ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी जुळून आला.

या निरीक्षण उपक्रमात विज्ञान प्रेमींसाठी थेट प्रात्यक्षिके, माहितीसह सायन्स पार्कच्या प्रांगणात विविध उभे खांब, बॉटल्स व लहान पाईप इ. च्या सहाय्याने त्या वस्तूंवर पडलेली सावली कशाप्रकारे हळूहळू लहान होत जाते आणि विशिष्ट वेळी ती काही क्षणांसाठी पूर्णपणे नाहीशी होते, याचा अविस्मरणीय प्रत्यक्ष अनुभव उपस्थितांनी घेतला. तसेच दि. १४ मे रोजीही प्रेक्षकांसाठी अशाच प्रकारच्या निरीक्षण उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या प्रसंगी सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे प्रेक्षकांशी संवाद साधताना “विज्ञानाबद्दलची ओढ मुलांमध्ये निर्माण व्हावी आणि अंधश्रद्धा दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क दरवर्षी अशा विशिष्ट खगोलीय घटनांच्या संदर्भाने उपक्रमांचे आयोजन करीत असते” असे सांगितले. या उपक्रमास भरघोस प्रतिसाद लाभावा यासाठी सायन्स पार्क व तारांगण कर्मचारीवृंदांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत प्रयत्न केले.

याचबरोबर दि. १५ मे २०२६ रोजी पिंपरी चिंचवड तारांगणाच्या ३-या वर्धापन दिनानिमित्त विशेष खगोलीय कार्यशाळा, मिनी तारांगणातील प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. तसेच दि. १७ व १८ मे २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवसा निमित्त छंदसम्राट सामाजिक संस्था, नागपूर व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क च्या संयुक्त उपक्रमाने कला व संस्कृतीचे खास प्रदर्शन आयोजित होणार आहे, तरी नागरिकांनी या उपक्रमांचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच उन्हाळी सुट्टीत विज्ञान व संग्रहालय समुदायाचा भाग बनून अर्थपूर्ण ज्ञानार्जनाची संधी घ्यावी, असे आवाहन श्री. प्रवीण तुपे, संस्थापक-संचालक, पिं.चिं.सा.पा. यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"