जादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक!

पिंपरी : ज्यादा पैशाचा परतावा देण्याचे आमीष दाखवून व विश्वास संपादन करून एका व्यक्तीकडून पाच लाख दहा हजार रुपये घेऊन परतावा न देता फसवणूक केली. ही घटना 21 ऑगस्ट 2024 ते 12 मार्च 2025 दरम्यान गणेश कॉम्प्लेक्स, सिद्धिविनायक मंदिराजवळ, संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विनोद चौहान (रा. चंदीगड, पंजाब- पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादीस जादा पैशाचा परतावा देतो असे सांगून विश्वास संपादन करत फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पाच लाख दहा हजार रुपये घेऊन परतावा न देता व मूळ रक्कम परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली .आरोपी यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे हे तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलांकडून देशी कट्टा जप्त!
पिंपरी : घातक शस्त्र जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना दोन अल्पवयीन मुलांनी या आदेशाचा भंग करून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल जवळ बाळगल्याने त्यांना ताब्यात घेतले. ही घटना 9 मे 2026 रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास काटे लॉन्स जवळील मोकळ्या जागेत दापोडी येथे घडली.
याबाबत नितीन सुरेश संकुनहट्टे पोलीस शिपाई, दापोडी पोलीस स्टेशन यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल न्यायालय येरवडा येथे हजर करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना दोन अल्पवयीन मुलांनी या आदेशाचा भंग करून 60 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल मॅगझिनसह, दोन जिवंत काडतूस जवळ बाळगली. कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैधरित्या घातक शस्त्र बाळगल्याने ही कारवाई करण्यात आली. दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख हे तपास करत आहेत.

