इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवल्याबाबत जाब विचारल्याने कोयत्याने मारहाण; एकास अटक!

पिंपरी : इंस्टाग्राम अकाउंटवर फिर्यादीच्या मुलाची स्टोरी ठेवल्याने जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार पाच मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास माऊली चौक, दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडली.

या प्रकरणी एका 49 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.. दत्तात्रय उर्फ सोन्या रामेश्वर पांचाळ (वय 18, समर्थ निवास, वाळके यांच्या घरी भाड्याने, समर्थ कॉलनी ,गल्ली नंबर सात, थेरगाव, वाकड), सुरज भुजबळ (वय 22, दत्त मंदिर रोड, वाकड ),आणि दोन अल्पवयीन तरुण यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तात्रय उर्फ सोन्या रामेश्वर पांचाळ यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला यांचा मुलगा उत्कर्ष आकाश जाधव यांनी आरोपी क्रमांक तीन यास त्याचे इंस्टाग्राम अकाउंट वर उत्कर्षला उद्देशून स्टोरी ठेवली. याबाबत आरोपीस जाब विचारल्याच्या कारणावरून आरोपी क्रमांक एक ते चार यांनी संगणमत करून फिर्यादीच्या मुलास जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावर व पायावर कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. आरोपींनी त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख हे तपास करत आहेत.

