फक्त मुद्द्याचं!

29th April 2026
पिंपरी-चिंचवड

छत्रपती शिवाजीमहाराज हे कालातीत व्यक्तिमत्त्व! : संदीप तापकीर

छत्रपती शिवाजीमहाराज हे कालातीत व्यक्तिमत्त्व! : संदीप तापकीर

जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प तिसरे
पिंपरी : ‘अवघ्या पन्नास वर्षांची गतिमान कारकीर्द लाभलेले छत्रपती शिवाजीमहाराज हे दूरदृष्टी असलेले कालातीत व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच स्वराज्याचे पुढे साम्राज्यात रूपांतर झाले!’ असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘मराठ्यांचा देदीप्यमान पराक्रम : गाथा स्वराज्य ते साम्राज्याची!’ या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना तापकीर बोलत होते. इतिहास अभ्यासक ब. हि. चिंचवडे अध्यक्षस्थानी होते.

viara vcc
viara vcc

तसेच नगरसेविका मनीषा चिंचवडे, प्रभाकर महाजन आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ब. हि. चिंचवडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘इतिहास हा किचकट विषय असल्याने त्याची सत्यता अस्सल कागदपत्रांच्या आधारेच मांडता येते!’ असे मत व्यक्त केले.

संदीप तापकीर पुढे म्हणाले की, ‘आपण आज जे स्वातंत्र्य मुक्तपणे उपभोगतो, त्याचे मूळ छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्वराज्यात आहे. शहाजीराजे यांनी दोन वेळा स्वराज्याची उभारणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते. त्यांच्या पराक्रमाची वर्णने ‘राधामाधवविलासचंपू’ या ग्रंथात नमूद केली आहेत. शिवाजीराजे हे शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब या दांपत्याचे आठवे पुत्र होते. बालपणापासून त्यांना राजा म्हणूनच घडविण्यात आले. बाल शिवबांचा इतिहास कवी परमानंद यांनी शब्दबद्ध केला आहे. १६४६ मध्ये शिवरायांच्या कारकिर्दीचा प्रारंभ झाला.

दादोजी कोंडदेव हे कधीही शिवबांचे गुरू नव्हते. कोरिगड हा किल्ला त्यांनी पहिल्यांदा जिंकला. त्यानंतर रोहिडा आणि नंतर तोरणा जिंकला. त्यांनी वडिलांकडून किल्ल्यांचे महत्त्व आणि गनिमी कावा शिकला; तर आईकडून न्यायदानाची पद्धत शिकले. आयुष्यातील पहिली लढाई फत्तेखानाविरुद्ध लढून विजय मिळवला. मोगलांशी संधान साधून आदिलशहाकडून शहाजीराजे यांची कैदेतून सुटका करण्याची मुत्सद्देगिरी दाखवली. १९५६ मधील जावळीपर्व हे शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे पर्व होते. स्वराज्याची उभारणी करीत असताना एकाही डावपेचाची त्यांनी कधीही पुनरावृत्ती केली नाही. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या विरोधातील लढाईला मंत्रयुद्ध म्हटले जाते. त्यानंतर लगेचच २८ नोव्हेंबरला पन्हाळा ताब्यात घेतला. अतिशय कार्यक्षम गुप्तहेर खाते हा महाराजांच्या प्रत्येक विजयातील महत्त्वाचा घटक होता.

उंबरखिंडीतील कारतलबखानाच्या विरोधातील यश हे गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. अठरापगड जातीच्या मावळ्यांना वेगवेगळी जबाबदारी सोपवून त्यांचा चतुराईने वापर केला; पण त्यांच्या हौतात्म्यानंतर महाराजांनी त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी पत्करली म्हणून त्यांच्यावर कधीही जातीयवादी असा आरोप केला जात नाही. आरमाराची राजधानी असलेला सिंधुदुर्ग बांधणाऱ्या शिवरायांच्या आयुष्यातील १६७० हे निर्णायक वर्ष होते. त्या एकाच वर्षात त्यांनी बत्तीस किल्ले जिंकले; आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. छत्रपती शिवाजीमहाराज आणि रामदासस्वामी यांची एकमेव भेट १६७२ मध्ये झाली होती; मात्र ते महाराजांचे गुरू नव्हते. महाराजांचे कर्तृत्व इतके अद्भुत आहे की, त्या इतिहासाचा अभ्यास न करता वक्तव्य करणे, हे अत्यंत चुकीचे आहे.

१६७४ पर्यंत त्यांच्या ताब्यात २४० किल्ले होते. ०६ जून १६७४ हा छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. त्यानंतरचा दक्षिण दिग्विजय हा प्रेरणादायी इतिहास आहे. ०३ एप्रिल १६८० या दिवशी त्यांचे निधन झाले तरी जोपर्यंत चंद्र – सूर्य आहेत, तोपर्यंत महाराजांच्या अलौकिक कर्तृत्वाचा इतिहास चिरकाल राहील. त्यानंतर छत्रपती संभाजीमहाराज यांनी शिवनीतीचा समर्थपणे अवलंब केल्याने स्वराज्याच्या विस्तारात मोठी भर पडली. संभाजीमहाराज यांचे बलिदान महाराष्ट्राने व्यर्थ जाऊ दिले नाही. राजाराममहाराज, ताराराणी यांच्या मुत्सद्दी युद्धनीतीमुळे स्वराज्य अबाधित राहिले. पेशवे आणि मराठी सरदारांनी पानिपताच्या संकटावर मात करून स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करून ते भारतभर पोहोचवले!’ ओघवत्या शैलीतून संदीप तापकीर यांनी विषयाची विस्तृत मांडणी केली.

ॲड. विपुल नेवाळे, महेश गावडे, बंडू भोकरे यांनी संयोजनात सहकार्य केले. सूरज भोईर यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"