फक्त मुद्द्याचं!

20th March 2026
पिंपरी-चिंचवड

प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा : महापौर रवि लांडगे

प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा : महापौर रवि लांडगे

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात विकासकामांचा सखोल आढावा
पिंपरी : प्रत्येक प्रभागातील नगरसदस्यांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांचे प्राधान्याने निराकरण करणे अत्यावश्यक आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नगरसदस्यांशी सातत्याने समन्वय राखत स्थानिक अडचणींची अचूक नोंद घेऊन त्या तत्परतेने व परिणामकारक पद्धतीने सोडवाव्यात, अशा स्पष्ट सूचना महापौर रवि लांडगे यांनी दिल्या.

viara vcc
viara vcc

नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर वेळेत कार्यवाही करणे गरजेचे असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट केल्यास विकासकामांना अधिक गती मिळेल, असेही महापौर रवि लांडगे यांनी नमूद केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड येथे नागरी सुविधांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण, स्थापत्य, सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, भटके कुत्रे, उद्यानांची देखभाल तसेच इतर मूलभूत नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान परिसरातील नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. सुरू असलेल्या विकासकामांना गती देताना गुणवत्तेची तडजोड होऊ नये, यावर विशेष भर देण्यात आला. तसेच अनावश्यक विलंब टाळून निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

प्रभागनिहाय सुरू असलेल्या विकासकामांचा सखोल आढावा घेत आगामी कामांचे नियोजन अधिक परिणामकारक पद्धतीने करण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे, निधीचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे आणि नागरिकांच्या गरजांनुसार कामांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नागरिकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी सर्व विभागांनी अधिक सजग, जबाबदारीने व उत्तरदायित्वाने कार्य करणे गरजेचे असल्याचे महापौरांनी अधोरेखित केले. तसेच प्रभागस्तरावर नियमित आढावा बैठका घेऊन समस्यांचे त्वरित निराकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीदरम्यान नगरसदस्यांनी त्यांच्या प्रभागातील विविध समस्या व आवश्यक सोयीसुविधांबाबत मुद्देसूद मांडणी केली.

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे, नीता पाडाळे, कोमल काळे, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, आशा सूर्यवंशी, पल्लवी वाल्हेकर, तसेच नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, सुरेश भोईर, विनोद नढे, संतोष कोकणे, धर्मपाल तंतरपाळे, निलेश तरस, शेखर चिंचवडे,उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"