उद्योजक हे राष्ट्राचे भाग्यविधाते : पद्मश्री गिरीश प्रभुणे

टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न
पिंपरी : ‘यशस्वी उद्योजक हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत!’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी काढले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने भारतरत्न जे आर डी टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार प्रदान सोहळ्यात गिरीश प्रभुणे बोलत होते. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर अध्यक्षस्थानी होते;

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी तौरल इंडिया लिमिटेडचे सी ई ओ ॲल्युमिनियममॅन भरत गीते यांना भारतरत्न जे आर डी टाटा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर साई ली इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक संदीप शिंदे – सरकार यांना (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार), सिद्धकला ऑटो स्टॅम्पिंगचे संचालक सुधीर भांदुर्गा (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगविभूषण पुरस्कार), वोगोफाय इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेडचे डाॅ. गणेश घंगाळे (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगभूषण पुरस्कार), एस बी आर मशिन्स प्रा. लिमिटेडचे सी ई ओ गणेश राऊत (भारतरत्न जे आर डी टाटा उद्योगभूषण पुरस्कार) आणि महेक इंडस्ट्रीजच्या संचालिका रेश्मा मुल्ला (भारतरत्न जे आर डी टाटा उद्योगसखी पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, ‘भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेतून कर्मयोगसिद्धान्त मांडला, तो भरत गीते यांनी आत्मसात केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळापासून शतक गाठेपर्यंत देशाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. याकाळात गीते आणि त्यांच्याबरोबर सन्मानित झालेले सर्व उद्योजक हे जणू भावी इतिहासातील सुवर्णपाने आहेत!’
उद्योगरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर भरत गीते यांनी, ‘भारतीय उद्योगांचे जनक जे आर डी टाटा यांच्या नावाचा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. एक कामगार म्हणूनच माझ्या औद्योगिक जीवनाचा प्रवास सुरू झाला. उच्चशिक्षण घेऊन विदेशात गेल्यावरही पुढे भारत देशातच काम करायचे आणि ॲल्युमिनियमविषयी प्रगत तंत्रज्ञान देशात आणायचे हा निश्चय केला होता. ग्रामीण पार्श्वभूमीमुळे व्यावसायिक चढउतार सोसत सकारात्मक मानसिकतेमुळे यशस्वी झालो.
एका छोट्या बालिकेच्या हस्ते वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘टाटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले; तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी हितगुज करीत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सचिन ईटकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘राष्ट्रनिर्माण ही टाटा उद्योगसमूहाने बांधिलकी मानली. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी उद्योजकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अरुण गराडे, प्रा. डॅा.. संभाजी मलघे, महेंद्र भारती, सुप्रिया सोळांकुरे, राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघोले, प्रतिमा काळे, इंद्रजित पाटोळे, राजू जाधव, प्रा. प्रभाकर दाभाडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री श्रीखंडे यांनी आभार मानले.

