स्वच्छ प्रशासनासाठी महापौर रवी लांडगे ॲक्शन मोडवर!

एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तातडीने बदलीचे आदेश
पिंपरी : महापालिका आस्थापनेवरील एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे आदेश नवनिर्वाचीत महापौर रवी लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.

महापौर रवी लांडगे आपल्या आदेशात म्हणतात, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. मात्र, महापालिकेच्या आस्थापनेवरील अनेक अधिकारी आणि कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अधिक काळ एकाच विभागात अथवा एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत.
स्थापत्य, पर्यावरण, नगररचना, बांधकाम परवाना, आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, भांडार आणि उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लेखापाल, भांडारपाल व अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत.
एकाच विभागात दीर्घकाळ राहिल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्थानिक स्तरावर हितसंबंध निर्माण झाले आहेत.यामुळे प्रशासकीय कामांत ‘अर्थपूर्ण वाटाघाटी’ आणि भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. हे महापालिकेच्या प्रतिमेसाठी अत्यंत घातक आहे. अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतरही नियमानुसार त्यांची बदली दुसऱ्या विभागात होणे अपेक्षित होते. मात्र, विभागप्रमुखांच्या मर्जीतील असल्याने पदोन्नती मिळूनही ते त्याच जुन्या विभागात कार्यरत आहेत, असेही महापौर लांडगे यांनी स्पष्टपणे नमूद केले.
विभागप्रमुखांकडून आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोडण्यास होणारा विरोध आणि प्रशासनाचे या विषयाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत असून पारदर्शकतेला हरताळ फासला जात आहे. यासाठी एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने इतरत्र बदली करून प्रशासनात फेरबदल करण्यात यावेत. या विषयाचे गांभीर्य ओळखून आपण तात्काळ कार्यवाही करून केलेल्या कारवाईचा अहवाल महापौर कार्यालयास सादर करावा, अशा सूचना महापौर रवी लांडगे यांनी दिल्या आहेत.

