हॉटेल व्यवसायात भागीदारीच्या अमीषाने 42 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : हॉटेल व्यवसायात भागीदारी करून चांगला नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून एका व्यक्तीची 42 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना डिसेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 दरम्यान चर्होली येथे घडली.
याबाबत चिमण निताई सरकार (वय 47, रा चर्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुकेश शेखर शेट्टी (वय 32, रा. वारजे, पुणे )आणि शंकर जगन्नाथ शेट्टी (वय 42, रा वारजे, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि वारजे येथील एका हॉटेलमध्ये गुंतवणुकीस त्यांना प्रवृत्त केले. फिर्यादीने कर्ज काढून 42 लाख रुपये गुंतवले. सुरुवातीचे काही महिने कर्जाचे हप्ते भरल्यानंतर आरोपींनी पैसे देणे बंद केले, तसेच फिर्यादीला विश्वासात न घेता ते हॉटेल दुसऱ्या व्यक्तीला चालविण्यास देऊन त्यातून आलेली रक्कम ही स्वतःकडे ठेवत फसवणूक केली. दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.

कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडास अटक
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातून तडीपार असताना बेकायदेशीरपणे शस्त्र कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका गुंडाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी जांबेगाव मुळशी करण्यात आली.
पोलीस शिपाई कारभारी पालवे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुन्ना उर्फ जुबेर मौला अत्तार (वय 36, रा. जांबेगाव ता मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुन्ना याला पिंपरी चिंचवड आणि परिसरातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्याचा तडीपरीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे लोखंडी कोयता मिळून आला असून तो लोकांमध्ये दहशत निर्माण करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. हिंजवडी पोलीस तपास करत आहे.

