भारतीय जनता पार्टी गटनेतेपदी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची निवड!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका भारतीय जनता पार्टी गटनेतेपदी नगरसेवक प्रशांत कृष्णराव शितोळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले असून महापालिकेवर वर्चस्व निर्माण केले आहे .

भारतीय जनता पार्टीचे एकूण 84 सदस्य निवडून आले आहेत. विभागीय आयुक्तांकडे पिंपरी चिंचवड महापालिका भारतीय जनता पार्टी गट व गटनेते अशी नोंदणी लवकरच केली जाणार आहे .या नोंदणीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मान्यता दिली आहे अशी माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी दिली.
नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक 32- ड सांगवी मधून ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर विजयी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज पार पाडली या बैठकीत प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली. प्रशांत शितोळे यांना महापालिकेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे महापालिकेत विविध विकास कामांना भाजप नगरसेवकांच्या ताकतीमुळे प्राधान्य दिले जाईल असे मत नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.

