फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ‘जयस्तंभ’ अभिवादन बंदोबस्तावरील पोलिसांना विशेष प्रशिक्षण!

पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ‘जयस्तंभ’ अभिवादन बंदोबस्तावरील पोलिसांना विशेष प्रशिक्षण!

पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक ‘जयस्तंभ’ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची व्यापक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ सामोरे जाण्यासाठी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित बैठकीत तब्बल एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेचे विशेष प्रशिक्षण दिले.

viara vcc
viara vcc

पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने प्राथमिक स्वरूपाच्या आगी, त्यावरील तातडीच्या उपाययोजना तसेच अग्निशमन उपकरणांचा योग्य वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आल्याने, आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेणे पोलिसांना अधिक सुलभ होणार आहे.

दरवर्षी १ जानेवारी रोजी होणाऱ्या या अभिवादन कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर जयस्तंभ परिसरातील बंदोबस्ताचा सविस्तर आढावा नुकताच पोलीस आयुक्तालयामार्फत घेण्यात आला. गर्दीच्या ठिकाणी आग लागल्यास ती कशी नियंत्रणात आणावी आणि ‘गोल्डन अवर’मध्ये (पहिल्या काही मिनिटांत) कोणती कार्यवाही आवश्यक आहे, यावर या प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला. पीएमआरडीएच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी आगीचे प्रकार ओळखणे आणि त्यानुसार योग्य उपकरणांची निवड व वापर याचे प्रात्यक्षिक दिले. या प्रशिक्षणामुळे जयस्तंभ परिसरात तैनात असलेला प्रत्येक पोलीस जवान आता प्राथमिक अग्निशमन कार्यासाठी सज्ज झाला आहे.

“मोठ्या जनसमुदायाच्या सुरक्षिततेला पोलीस व प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पोलीस दल आणि अग्निशमन विभाग यांच्यातील या समन्वयामुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद व प्रभावी प्रतिसाद देणे शक्य होईल.” — देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"