भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उत्तुंग भरारी घेण्याचा अधिकार : महावीर जोंधळे

शाहिरी, व्याख्यान, गीतांच्या कार्यक्रमासोबतच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान
पिंपरी, दि. २७ नोव्हेंबर २०२५ – भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला उत्तुंग भरारी घेण्याचा अधिकार प्राप्त झाला असून भारतीय संविधान म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करणारा मानवमुक्तीचा जाहिरनामा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी केले.

भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पिंपरी येथील प्रबोधनात्मक कार्यक्रमात ‘भारतीय संविधान -मानवमुक्तीचा जाहिरनामा’ या विषयावर व्याख्यान देताना जोंधळे बोलत होते. या कार्यक्रमास राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, महापालिका उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ग्रंथालय प्रमुख प्रतिभा मुनावत, ग्रंथपाल प्रवीण चाबुकस्वार, राजू मोहन, राजेंद्र आंभेरे, कांचन कोपर्डे, कामगार नेते निवृत्ती आरवडे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, दिपक म्हस्के आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचनेत मानवी मूल्यांच्या संरक्षणाचा वारसा अधोरेखित केला आहे, असे नमूद करून जोंधळे म्हणाले, भेदभावमुक्त समाज, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मानवमुक्तीची मूलतत्त्वे असून संविधान त्यांना बळकटी देते. आपले संविधान हे अखंड भारताच्या विकासाचे बलस्थान असून उन्नतीचा मार्ग सर्वांना उपलब्ध करून देण्याची संधी संविधानामुळे आपल्याला मिळते. देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी भारतीयांनी कटिबद्ध असले पाहिजे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत संविधानिक जाणीव आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने संविधान वाचले, समजले आणि आचरणात आणले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे भारतीय लोकशाही अधिक मजबूत व सक्षम बनली आहे. सामाजिक न्याय, समान संधी आणि मानवीमूल्यांची जपणूक ही आंबेडकरांची शिकवण आजही तितकेच महत्वपूर्ण असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. संविधानाचा अभ्यास प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. संविधानिक सजगतेची आवश्यकता वाढली असून नागरिकांनी आपल्या अधिकारांबरोबरच कर्तव्यांबद्दलही जागरूक राहावे, असे मत त्यांनी जोंधळे यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले.
भारतीय संविधान आपल्याला न्याय, समता आणि प्रगतीची दिशा दाखवते- ॲड. गोरक्ष लोखंडे
महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात ज्ञानाचा दिवा पेटवून सामाजिक समतेची पायाभरणी केली. हा विचार भारतीय संविधानात अधोरेखित झाला असून भारतीय संविधान आपल्याला न्याय, समता आणि प्रगतीची दिशा दाखवते. या संविधानिक मूल्यांची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणारे विद्यार्थी आपल्या शहराचा अभिमान आहेत. त्यांच्या कष्ट, शिस्त आणि ध्येयवादी प्रयत्नांमधून सक्षम व उत्तरदायी प्रशासन निर्माण होण्यास मदत होईल.
महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण झोरे, सचिन माने, दिनकर गायकवाड, अनिता चट्टेकार, अभिषेक नऱ्हे, प्रियांका टिळेकर, सुजाता यमगर, पूजा देशमुख, शुभांगी मगर, निखील टोके, संतोष फसले आदींचा समावेश होता.
संविधान महाजलश्यातून भारतीय संविधानाला मानवंदना
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील (भीमसृष्टी) मैदानात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी संविधान दिनी पहिल्या सत्रात सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे व शाहिर सुरेश सूर्यवंशी यांनी आपल्या भावपूर्ण आवाजात गीते व पोवाडे सादर केले. त्यांच्या सुरेल गाण्यांतून भारतीय संविधानाची महती, समतेचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव प्रभावीपणे व्यक्त झाला.
यानंतर सुप्रसिद्ध गायक संदेश उमप व सहकाऱ्यांनी महाजलश्यातून भारतीय संविधानाला सांगीतिक मानवंदना दिली. सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे, प्रबुद्ध जाधव, प्रतिक सोळसे, दिनकर हिरोडे, आसावरी तांबे, प्रज्ञा वळूंज यांनी भारतीय संविधानाचा गौरव करणारे गीते सादर करून भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.
“संविधानाचं पुस्तक हातात, भीमराव बसला रथात”, “आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे”, “सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव माझा”, “मै भीमराज की बेटी”, “भीमराव माझा रुपया बंधा” लई बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, अशी विविध सुमधुर गाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संदेश उमप व सहकाऱ्यांनी जादुई आवाजात सादर केली.

