फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

सदनिकांच्या लाभामुळे लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार : उपायुक्त अण्णा बोदडे

सदनिकांच्या लाभामुळे लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार : उपायुक्त अण्णा बोदडे

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ३२ घरकुलांसाठी सोडत संपन्न
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या घरकुलातील सदनिकांच्या लाभामुळे लाभार्थ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले असून, त्याचा वापर योग्य करावा, सदनिका भाड्याने देऊ नयेत व परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने, केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने चिखली सेक्टर क्र. १७ व १९ येथे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील रिक्त ३२ सदनिकांसाठीची संगणकीय सोडत आज चिंचवड येथे झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता सुनील दांगडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्ज्वला गोडसे, मुख्य लिपिक सुनील माने, दिलीप वाघमोडे, योगिता जाधव, कुणाल डोळस, सूरज लखन, मंगेश पजई यांच्यासह विभागातील अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. सर्व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर घरकुल मिळाल्याचा आनंद दिसून येत होता.

महापालिका प्रशासनाने पुनर्वसन कार्यात गती आणत अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. या प्रकल्पामध्ये १५८ इमारती उभारण्यात आल्या असून प्रत्येक इमारतीत ४२ सदनिका आहेत. आतापर्यंत ६ हजार ६३६ पैकी ६ हजार ६०२ सदनिकांचे वितरण पूर्ण झाले आहे. सदर प्रकल्पातील विविध इमारतींमध्ये रिक्त असलेल्या सदनिकांची संगणकीय सोडत आज संपन्न झाली. सदर प्रकल्पातील सदनिकांच्या वाटपाची प्रक्रिया पूर्ण होत आहे.

लाभार्थ्यांना घरकुल मिळणे ही त्यांच्यासाठी आशेची नवी पहाट आहे. ही सोडत प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली असून, येत्या सोमवारपासून करारनामा झाल्यानंतर प्रत्यक्ष ताबा देण्याची कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांना सुरक्षित निवारा देणे हे आमचे प्राधान्य आहे. -तृप्ती सांडभोर अतिरिक्त आयुक्त, पिंपरी–चिंचवड महानगरपालिका

अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात स्वतःचे घर असण्याचे स्वप्न आज साकार झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या या प्रकल्पामुळे आम्हाला स्वतःचा निवारा मिळत आहे. याचा अत्यंत आनंद झाला आहे. – धर्मा जगझाप,* लाभार्थी

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"