कुष्ठरोग निर्मूलनासाठी महापालिका राबवत आहे ‘कुष्ठरोग शोध अभियान’

वैद्यकीय विभागाच्या पथकांकडून संपूर्ण शहरात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर गृहभेटी देत तपासणी मोहीम
पिंपरी : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. या व्यापक मोहिमेचा उद्देश कुष्ठरोगाचे लवकर निदान, योग्य उपचार आणि समाजातील भीती व गैरसमज दूर करणे हा आहे. या उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग सक्रियपणे सहभागी झाला असून शहरातील सर्व प्रभागांमध्ये घराघरांत जाऊन नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय पथकांत आशा स्वयंसेविका आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांचा समावेश असून ते सलग चौदा दिवस व्यापक सर्वेक्षण करणार आहेत. प्रत्येक पथक दररोज गृहभेटी देत त्वचेवरील चट्टे, सुन्नपणा, नसांमध्ये सूज आणि संवेदना कमी होणे यांसारख्या संभाव्य लक्षणांची प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करत आहे. कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास रुग्णांना तात्काळ महापालिका रुग्णालयांमध्ये पुढील निदान आणि उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, नागरिकांनी या राज्यस्तरीय कुष्ठरोग शोध अभियानाला सहकार्य करून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्य संरक्षणासाठी सहकार्य करावे.
कुष्ठरोगाचे लवकर निदान झाले तर उपचार अत्यंत परिणामकारक ठरतात. पिंपरी चिंचवड महापालिकेची पथके नागरिकांशी संवाद साधत तपासणी करत असून शक्य तितक्या लवकर रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय विभाग तत्पर आहे. कोणतीही लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी विलंब न करता नजीकच्या महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

