शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहरी विकासाच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील : संजय कुलकर्णी

‘इंटरनॅशनल अर्बन अँड रिजनल को-ऑपरेशन आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया कार्यक्रम’चा भारतात शुभारंभ
पिंपरी : नवी दिल्ली येथे आयोजित अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स फेस्टिव्हल २०२५ दरम्यान “समावेशक, सक्षम व शाश्वत शहरे” या विषयाखाली ‘इंटरनॅशनल अर्बन अँड रिजनल को-ऑपरेशन’ (IURC) आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया कार्यक्रमाचा भारतात अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी ‘आययूआरसी इंडिया किक-ऑफ मिटिंग’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर सत्रात युरोपियन युनियनचे प्रतिनिधी, राष्ट्रीय भागीदार तसेच सहा भारतीय पायलट शहरे, ज्यामध्ये चेन्नई, पिंपरी चिंचवड, जबलपूर, कटक, गँगटोक आणि लेह यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी शाश्वत शहरी विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संधींवर चर्चा झाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या योजनांविषयी दिली माहिती
या सत्रात मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रतिनिधित्व करत शहराच्या शाश्वत विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली. त्यांनी शहरी नवोपक्रम, सार्वजनिक वाहतूक सुधारणा, हवामान लवचिकता आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील महापालिकेचे प्रयत्न अधोरेखित केले. तसेच वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या पायाभूत आव्हानांवर मात करण्यासाठी बहुस्तरीय समन्वयाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पिंपरी चिंचवड महापालिका सध्या हवामान अनुकूल विकास, हरित गतिशीलता, कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवित आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून महापालिका जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शहरी धोरणे आत्मसात करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
चर्चेदरम्यान हवामान अनुकूलता, सर्क्युलर इकॉनॉमी, डिजिटल नवोपक्रम आणि शाश्वत वित्तपुरवठा या सामाईक प्राधान्य क्षेत्रांवर सविस्तर विचारमंथन झाले. युरोप आणि भारतीय प्रतिनिधींनी या भागीदारीला स्मार्ट सिटीज मिशन आणि नॅशनल अर्बन पॉलिसी फ्रेमवर्कशी सुसंगत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सत्राचा समारोप संयुक्त कृती आराखडे, क्षमता-वृद्धी उपक्रम आणि तांत्रिक देवाणघेवाण सुरू करण्याच्या वचनबद्धतेने झाला. या उपक्रमाने युरोप–भारत सहकार्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
यावेळी व्हिक्टोरिया कैडालोवा (कार्यक्रम व्यवस्थापक, युरोप सर्व्हिस फॉर फॉरेन पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स, बँकॉक), लुट्झ कोप्पेन (धोरण अधिकारी, डायरेक्टरेट जनरल फॉर रिजनल अँड अर्बन पॉलिसी), पाब्लो गांदारा (टीम लीडर, आययूआरसी आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया), तसेच स्मिता सिंग (वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, युरोप प्रतिनिधीमंडळ) आदी उपस्थित होते.

