पारंपरिक पद्धतीने छट पूजा उत्साहात!

पिंपळे सौदागर,चिंचवड, मोशीत इंद्रायणीवर गंगा आरती
पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील इंद्रायणी, पवना नदी किनारी सोमवारी (दि २७) सायंकाळी पावसाळी वातावरणातही उत्तरभारतीयांनी सूर्यदेवास अर्ध्य देऊन, पारंपरिक पद्धतीने छट पूजा उत्साहात साजरी केली. मोशीत गंगा पूजन केले.पिंपळे सौदागर, चिंचवड आणि पिंपरीत विविध कार्यक्रम झाले. मंगळवारी सकाळी सूर्योदयालाही छट पूजा व्रताची सांगता झाली.

उत्तर भारतात आणि बिहारमध्ये कुटुंब आणि विश्वाच्या कल्याणासाठी तसेच पीक पाणी मुबलक यावे, यासाठी सूर्याला अर्ध्य देऊन त्याची उपासना आणि छट मातेची पूजा केली जाते. व्रत केले जाते. सूर्यास्त व सूर्योदयावेळी पाण्यात उभे राहून सूर्यदेवतेची पूजा-अर्चना केली. त्यामुळे आज सोमवारी सायंकाळी पावसाळी वातावरण असतानाही शहरातील तीनही नदी घाटावर महिला, पुरुष तसेच बाल-गोपाल यांची मोठी गर्दी झाली होती.
पिंपळे सौदागर येथील उत्तर भारतीय नागरिकांसाठी नाना काटे सोशल फौंडेशनच्या वतीने दि २७ व २८ नोव्हेंबर रोजी महादेव मंदिरा शेजारील पवना नदी घाटावर छट पूजेचे आयोजन करण्यात आले. उत्तर भारतीयांच्या दृष्टीने छट पूजा म्हणजे धरणी माता व सूर्य भगवानची पूजा आहे. या प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी मा.नगरसेवक विलास पाडाळे,युवा नेते उमेश काटे, सोनिगरा ज्वेलर्सचे प्रोप्रा.दिलीप सोनिगरा,जितेंद्र सोनिगरा तसेच आयोजक ब्रिजेश सिंह,दुर्गेश कुमार सिंह ,राकेश गुप्ता विनयकुमार गुप्ता ,विजय चौहान,अमरजीत सिंह,मानसिंह,विजय बहादूर प्रजापती,अजय कुमार गुप्ता,जनार्दन सिंह व उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोशी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छट पूजा केली.अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढीचे महंत राजूदास महाराज, आमदार महेश लांडगे, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, माजी महापौर राहुल जाधव, आयोजक डॉ. लालबाबू गुप्ता, संदीप साकोरे आदी उपस्थित होते. राजुदास महाराज महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने, विश्वाला शांती आणि संयमाचा मार्ग दाखवणारे ज्ञानेश्वर माऊली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर सर्वांनी संकल्प करावा की, सर्वांना सामावून घेणारा एकमेव धर्म म्हणजे सनातन धर्म आहे. याची पताका जगात उंचावण्यासाठी आणि भारत देश हिंदू राष्ट्र होण्यासाठी सर्वांनी समर्पण भावनेने योगदान द्यावे. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

