फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

मोशी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातून १४ मेगावॅट वीज निमिर्ती!

मोशी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातून १४ मेगावॅट वीज निमिर्ती!

कचऱ्यातून वीज निर्मितीचा आदर्श नमुना; कोट्यावधी रुपयांची बचत
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर यासाठी मोठे पाऊल उचलत मोशी कचरा डेपो येथे अत्याधुनिक ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून शहरातील कचऱ्यापासून १४ मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती केली जात आहे. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्वावर उभारण्यात आलेला हा प्रकल्प मे. अँटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी प्रा. लि. या कंपनीने ऑक्टोबर २०२३ मध्ये कार्यान्वित केला असून, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

viara vcc
viara vcc

ऑगस्ट २०२५ पर्यंत या प्रकल्पाद्वारे ३ लाख ४१ हजार १११ मेट्रिक टन कचऱ्यापासून तयार इंधन ( Refuse Derived Fuel – RDF) वापरून १६ कोटी ६६ लाख ३६ हजार ७५० युनिट्स वीज निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी, प्रकल्प संचालनासाठी आवश्यक वीज खर्च वगळता १५ कोटी ५७ लाख ४० हजार १९८ युनिट्स वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ग्रीडमध्ये पुरवण्यात आली आहे. ही वीज महापालिकेच्या रावेत व चिखली जल शुद्धीकरण केंद्र, कासारवाडी व चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रे तसेच थेरगाव रुग्णालयात ‘ओपन ऍक्सेस’ संकल्पनेतून वापरली जात आहे. याशिवाय महापालिकेचे सहा नवीन वीज ग्राहक ज्यामध्ये वाय.सी.एम. रुग्णालय, चिखली, भाटनगर, आकुर्डी, पिंपळेनिलख आणि चिंचवड येथील मैलाशुद्धीकरण केंद्रे हे देखील येथे ओपन ऍक्सेस द्वारे लवकरच जोडले जाणार आहेत. या उपक्रमामुळे आतापर्यंत ७६ कोटी ५७ लाख रुपयांची वीज बिलातील बचत महापालिकेला साधता आली आहे.

या प्रकल्पामुळे मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कचऱ्यातून हरित उर्जानिर्मितीमुळे शहराला स्वच्छ आणि पर्यावरणपूरक भविष्य मिळत आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प हा पिंपरीचिंचवडसाठी एक आदर्श आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा नमुना ठरत आहे. तरी नागरिकांनी घरगुती व औद्योगिक कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
• प्रकल्प क्षमता: १४ मेगावॅट/प्रतितास ,• एकूण निर्मित वीज: १६ कोटी ६६ लाख ३६ हजार ७५० युनिट्स (ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत) , • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला पुरवलेली वीज: १५ कोटी ५७ लाख ४० हजार १९८ युनिट्स, • वीज बील सवलतीस पात्र युनिट्स: १० कोटी ०२ लाख ५८ हजार ४५६ ,• महापालिकेची एकूण वीज बचत: ७६ कोटी ५७ लाख रुपये ,• वीजनिर्मितीसाठी वापरलेला कचरा: ३ लाख ४१ हजार १११ मेट्रिक टन

पिंपरी चिंचवड महापालिकेस सध्या आवश्यक असणारी विजेची गरज ‘वेस्ट टू एनर्जी’ आणि ‘सोलर एनर्जी’सारख्या अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा प्रभावी वापर करून पूर्ण करण्याचा म्हणजेच नेट झिरो शहर बनविण्याचा आमचा मानस आहे. या दिशेने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. — अनिल भालसाकळे, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"