पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पूरग्रस्तांसाठी 43 लाख 95 हजाराचा निधी!

पिंपरी : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. धाराशिव, बीड, नांदेड,सोलापूर, छ.संभाजीनगर आणि लातूर परिसरात शेतकऱ्यांचे पीक आणि जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी दिवाळीच्या तोंडावर संकटात सापडला आहे. या नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पुढे सरसावले आहे .मुख्यमंत्री सहायता निधीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत तब्बल 43 लाख 95 हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार हे उपस्थित होते. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. या कठीण काळात देवस्थानासह सर्व स्तरातून बळीराजाला मदत दिली जात आहे. राज्यभरातून लागणाऱ्या दैनंदिन गरजांच्या वस्तू ,अन्नधान्य, कपडे पाठवली जात आहेत. यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेली मदत निश्चितच मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मोठा आधार देणारी आहे. पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी जपत एक उत्तम उदाहरण यानिमित्ताने दाखवले आहे .

