रेबीज दिनानिमित्त २६ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर या कालावधीत रेबीज लसीकरण सप्ताह!

पिंपरी : जागतिक रेबीज दिन म्हणून दि. २८ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून ‘पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ व ‘मिशन रेबीज’ यांचे संयुक्त विद्यमाने महानगरपालिका हद्दीत दि.२६ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर या कालावधीत रेबीज लसीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

या सप्ताहा दरम्यान महानगरपालिकेमार्फत पाळीव श्वानांना पशुवैद्यकीय दवाखाना (नेहरूनगर व निगडी प्राधिकरण) येथे तसेच भटक्या श्वानांना श्वान पथकामार्फत मोफत लसीकरण सुविधा देण्यात येणार आहे. या अनुषंगाने शहरातील श्वानपालकांनी आपल्या श्वानांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. रेबीज या रोगाबद्दल जनजागृती व रेबीज संसर्गजन्य रोगाचे मुळापासून निर्मुलन करणेकरिता जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय विभागामार्फत लसीकरण व जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.
२६ सप्टेंबर २०२५ रोजी महानगरपालिका हद्दीतील मोशी, चिंचवड गाव, रावेत, पुनावळे या ठिकाणी प्रतिनिधित्व स्वरुपात भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याकरिता पथकांची नियुक्ती करून लसीकरण मोहीम सुरु करण्यात येत आहे. तरी, नागरिक , पशुपालक , प्राणीप्रेमी यांनी जास्तीत जास्त श्वानांचे लसीकरण करणेकरिता सहकार्य करणेचे आवाहन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले आहे.

