फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

‘व्हिजन@५०’ उपक्रमांतर्गत कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर झाले विचारमंथन!

‘व्हिजन@५०’ उपक्रमांतर्गत कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर झाले विचारमंथन!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने ‘व्हिजन@५० शहर धोरण’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षण विभागासाठी पुढील पाच वर्षांचा धोरणात्मक आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने विचारमंथन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील सहभागी होऊन आपले मत मांडले.

navratra 4
navratra 4

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘व्हिजन@५० शहर धोरण’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करण्यात येत आहे. शहराचा विकास करताना प्राधान्यक्रम कोणत्या गोष्टींना द्यावा? कोणत्या क्षेत्रांना महत्त्व द्यावे? येथील शिक्षण व्यवस्था कशी असावी? पर्यावरण उत्तम राहावे यासाठी काय उपाययोजना कराव्यात? अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.

त्याच अनुषंगाने आज महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, प्रथम या संस्थेच्या सह संस्थापक रजिया फरीदा यांच्यासह आकांक्षा फाउंडेशन, सत्त्वा कन्सल्टिंग, संगात, किंडर स्पोर्ट्स, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया, लीडरशिप इक्विटी, पाय जाम फाउंडेशन, टीच फॉर इंडिया, लेंड अँड हँड, युनिसेफ अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यशाळेत पिंपरी-चिंचवड शहरातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेऊन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे डेटा-आधारित विश्लेषण, शालेय बाह्य मुले, शाळांमध्ये राबविलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे सादरीकरण आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेतील यशस्वी पद्धती, शिक्षण विभागासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणे, या क्षेत्रातील नवीन आव्हाने यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, महापालिकेतील पाच विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव आणि भविष्यात शाळांमध्ये पाहायला आवडणारे बदल याबाबत मते व्यक्त केली. डिजिटल साधनांचा वापर वाढवणे, शिक्षक-विद्यार्थी संवाद अधिक प्रभावी करणे, क्रीडा व सर्जनशील उपक्रमांना अधिक महत्त्व देणे, आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता यांसारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी भर दिला.

कार्यशाळेतून आलेल्या सूचनांच्या आधारे शिक्षण विभागासाठी सर्वसमावेशक, विद्यार्थी-केंद्रित आणि दूरदर्शी धोरणात्मक आराखडा तयार केला जाणार असून, यामुळे पुढील पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरातील शिक्षण क्षेत्रात एक आदर्श उभा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण, समावेशक शिक्षण मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. या धोरणात्मक आराखड्याद्वारे आम्ही फक्त शाळा सुधारत नाही, तर संपूर्ण शिक्षण संस्कृतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांच्या गरजा, शिक्षकांचे योगदान आणि समाजाची अपेक्षा लक्षात घेऊन तयार होणारा हा आराखडा पुढील पाच वर्षांत शहराच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देईल. शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"