डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिंनींनी घेतली महापालिकेच्या कमकाजाविषयी माहिती!

विविध विभागांच्या कामकाजासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयात कला (अर्थशास्त्र) शाखेतील विद्यार्थिनींनी पिंपरी चिंचवड महापालिकेला आज भेट दिली. यावेळी त्यांना महापालिकेचे प्रशासकीय कामकाज कसे चालते, नागरिकांना महापालिकेकडून कोणकोणत्या अत्यावश्यक व इतर सुविधा दिल्या जातात, महापालिकेमध्ये कोणकोणते विभाग असतात… अशी विविध माहिती देण्यात आली.

महापालिका सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, अजय सूर्यवंशी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी विद्यार्थिनींना महापालिकेतील विविध प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती दिली. याप्रसंगी माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, लिपिक अभिजित डोळस, महाविद्यालयाचे प्रा. शरद जगताप, प्रा. अश्विनी घोडके यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेतील स्थापत्य विभाग सर्वात प्रथम या विद्यार्थिनींना दाखवण्यात आला. येथे देवन्ना गट्टूवार यांनी शहरातील रस्ते, स्थापत्य विभाग, इमारत, बांधकाम यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन शहर नियोजन व विकासाची माहिती दिली. त्यानंतर पाणीपुरवठा व जलनिःसारण विभागात अजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना शहरातील पाणीपुरवठा संरचना, पाणीपुरवठ्याचे स्रोत, वितरण व्यवस्था, पाणी साठवण व शुद्धीकरण प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली. तर, प्रफुल्ल पुराणिक यांनी महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे स्वागत केले .
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात विद्यार्थिनींना महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे, शहरासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मूलभूत सेवांचे तसेच नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने आज महाविद्यालयातील विद्यार्थिनींची पिंपरी चिंचवड महापालिकेला भेट आयोजित केली होती. यावेळी महापालिकेतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. हा अनुभव विद्यार्थिनींच्या शैक्षणिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. – प्रा. शरद जगताप, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय

