सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली अटक!

पिंपरी : डुडी परिधान करून महिलांचे दागिने, सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आले असून साडेसहा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव अनिल सरोदे (वय 24 राहणार त्रिवेणी नगर निगडी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे . रावेत आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे घडले होते. लागोपाठ घडलेल्या गुन्ह्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली . सलग पाच दिवस चिखली आणि रावेत परिसरातील महापालिकेने बसवलेल्या व खाजगी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. लाल आणि निळी डुडी परिधान करून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारा आरोपी हा एकच असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस आल्याची माहिती मिळताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी 15 किलोमीटर पाठलाग करून त्याला दुचाकी सह पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चार मंगळसूत्र, चार घरफोड्या आणि एक दुचाकी चोरीचा असे नऊ गुन्हे उघडकीस आले . त्याच्याकडून चार सोन्याचे मंगळसूत्र, एक दुचाकी, सहा लाख 53 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ पुढील तपास करत आहेत.
.

