पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला चांगला प्रतिसाद!

पिंपरी चिंचवड शहरातून २५६ टनांहून अधिक निर्माल्याचे संकलन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव काळात पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात आलेल्या निर्माल्य संकलन मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमांतर्गत २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण २५६.१७ टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे नदी, नाले व तलावात निर्माल्य टाकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले असून जलप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे तसेच उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलनाची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमांतर्गत संकलित झालेल्या निर्माल्याचा पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर करून त्याद्वारे खत निर्मिती करण्यात येणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयानुसार संकलित निर्माल्य (आकडेवारी २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ या काळातील)
अ क्षेत्रीय कार्यालय – २५.६० टन, ब क्षेत्रीय कार्यालय – ६१.०९ टन ,क क्षेत्रीय कार्यालय – ३३.६५ टन, ड क्षेत्रीय कार्यालय – ३१.१४ टन, इ क्षेत्रीय कार्यालय – ३२.१६ टन, ग क्षेत्रीय कार्यालय – २२.१५ टन, फ क्षेत्रीय कार्यालय – ३०.०६ टन, ह क्षेत्रीय कार्यालय – २०.३० टन, एकूण संकलन – २५६.१७ टन
गणेशोत्सव काळात शहरातील नागरिक, गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांनी निर्माल्य संकलन मोहिमेला प्रतिसाद देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दाखविलेली जागरूकता उल्लेखनीय आहे. या उपक्रमात नागरिकांनी घेतलेल्या सक्रिय सहभागामुळे पर्यावरण जपण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. *– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका