पावसाच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू-मलेरिया निर्मूलनासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजना!

पावसामुळे साचलेल्या पाण्यात डासांची वाढ; औषध फवारणी, तपासण्या व दंडात्मक कारवाईद्वारे नियंत्रण
पिंपरी : पावसाळ्यामुळे सर्वत्र पाणी साचणे व ओलसरपणाचे प्रमाण वाढले असून डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांचा धोका गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने डास निर्मूलन मोहिमेला गती दिली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.

पावसामुळे घरांच्या अंगणात, छपरांवर, बांधकाम स्थळांवर, भंगाराच्या ठिकाणी तसेच विविध कंटेनरमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. हे थांबवण्यासाठी औषध फवारणी, घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी, तसेच जनजागृती आणि दंडात्मक कारवाईवर विशेष भर देण्यात आला आहे.
पालिकेची कारवाई
घरांची तपासणी: ८१ लाख ३२ हजार ८९ घरांची तपासणी; त्यापैकी १२ हजार ८१४ घरांमध्ये डास वाढीस पोषक स्थिती.
कंटेनर तपासणी: ४३ लाख ३२ हजार ५३० कंटेनरपैकी १३ हजार ८६४ कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती.
भंगार दुकाने: १७०३ दुकानांची तपासणी.
बांधकाम स्थळे: १९९९ स्थळांवर पाणी साचल्याचे निदर्शनास.नोटीस व दंड: ३ हजार ९५३ नोटिसा, ९८८ नागरिक/आस्थापनांवर दंडात्मक कारवाई; ३५ लाख ८१ हजार रुपये दंड वसूल.
पावसाळी प्रतिबंधात्मक उपक्रम
नियमित औषध फवारणी, घरोघरी माहितीपत्रके वितरण, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण, प्रभागस्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा
“डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा आणि घराभोवती साचलेले पाणी काढून टाकावे. पावसाळ्यातील स्वच्छता हीच आजारांपासूनची खरी बचावात्मक ढाल आहे.” – सचिन पवार, उप आयुक्त (आरोग्य विभाग), पिंपरी चिंचवड महानगरपालिका