पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चार सदस्यीय ३२ प्रभाग रचनेचे नकाशे तयार!

प्रभाग रचना २२ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार
पिंपरी : महापालिकेकडून चार सदस्यीय ३२ प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले असून आराखडा आणि नकाशे मान्यतेसाठी नगर सचिव विभाग, राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले जाणार आहेत. प्रभाग रचना २२ ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रभागरचना कशी असेल, या बाबत इच्छुकांसह माजी नगरसेवकांची उत्सुकता वाढली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहे. २०१७ नंतर आठ वर्षांनी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रभागरचना कशी असणार, या बाबत तर्कविर्तक लढविले जात आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे त्याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. दरम्यान, महापालिका १२ मार्च २०२२ पासून बरखास्त आहे. आयुक्त हे प्रशासक म्हणून १३ मार्च २०२२ पासून महापालिकेचे कामकाज पाहत आहेत.
शहराची सन २०११ ची जनगणना विचार घेऊन प्रभागातील मतदार संख्या निश्चित केली आहे. प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार घेतला आहे. आवश्यतेनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणीही केली आहे. महापालिकेच्या समितीने तयार केलेल्या प्रभाग रचनेवर आयुक्त शेखर सिंह यांची स्वाक्षरी झाली आहे. आता प्रारूप प्रभाग रचनेचा नकाशा राज्य शासनाच्या नगर विभाग विभागाकडे मंगळवारी (दि.५) पाठविला जाणार आहे. त्या विभागाकडून नकाशे राज्य निवडणूक आयोगास ६ ते ११ ऑगस्ट या कालावधीत सादर केला जाणार आहे. आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे २२ ऑगस्टला प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना घेतल्या जाणार आहेत. हरकती व सूचना २८ ऑगस्टपर्यंत स्वीकारल्या जातील. त्यावर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाईल.
एक जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार
शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९आहे. त्यानुसार प्रभागात किमान ४९ हजार आणि कमाल ५९ हजार मतदार संख्येचा समावेश असणार आहे. त्यानंतर १५ वर्षांत लोकसंख्येत तसेच, मतदार संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात १७ लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मतदार संख्या वाढणार आहे. एक जुलै २०२५ ची मतदार यादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार त्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाकडून मागविल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ प्रभाग रचनेच्या मसुदा तयार झाला आहे. प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशा नगर विकास विभागाकडे आज मंगळवारी (दि.५) पाठविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता मिळाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. -अविनाश शिंदे, सहायक आयुक्त

