पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार भवनासाठी जागेची मागणी!

आमदार जगताप यांची पालिका आयुक्तांना लेखी सूचना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवन उभारण्यासाठी जागेची तरतूद प्रारूप विकास आराखड्यात करण्यात यावी, अशी लेखी सूचना आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. या निर्णयामुळे शहरातील पत्रकारांना स्वतंत्र, सुसज्ज आणि हक्काचे व्यासपीठ निर्माण होणार आहे.

मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत पत्रकारांचे प्रश्न मांडल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार जगताप यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव असून त्यांच्या न्याय हक्कांसाठी आपण सदैव पाठीशी राहू, असे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले. पत्रकारांचा आपल्यावर विश्वास असावा, पण आपण चुकलो तर त्यांनी ती चूक निर्भिडपणे निदर्शनास आणून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.