फक्त मुद्द्याचं!

6th September 2025
पिंपरी-चिंचवड

प्राधिकरणात रंगला ‘किड्स सायकल डे’चा अनोखा उपक्रम!

प्राधिकरणात रंगला ‘किड्स सायकल डे’चा अनोखा उपक्रम!

‘ब्लूमबर्ग सायकल इन्फ्रास्ट्रक्चर’ योजनेसाठी देशातून निवडलेलं एकमेव शहर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ उपक्रमाअंतर्गत निगडी प्राधिकरण परिसरात “किड्स सायकल डे” हा एक आगळा-वेगळा उपक्रम पार पडला. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत घेतलेल्या या उपक्रमात, मुलांनी स्वतः अनुभवलेल्या रस्त्यांमधून सुरक्षित व मुलांसाठी योग्य अशा रस्त्यांची गरज अधोरेखित केली.

vaiga vcc
vaiga vcc

या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी सायकलवरून ३ किलोमीटरचा मार्ग पार करत शहरातल्या विविध प्रकारच्या रस्त्यांचा अनुभव घेतला. संरक्षित सायकल ट्रॅक, बीआरटी मार्ग, रंगवलेले रस्ते, नव्याने तयार केलेल्या रस्त्यांपासून ते अजूनही असुरक्षित असलेल्या भागांपर्यंत. या अनुभवातून त्यांनी काही ठिकाणी आनंद, तर काही ठिकाणी भीतीही व्यक्त केली आणि हीच निरीक्षणं पालिकेसाठी महत्त्वाची ठरणार आहेत.

हा उपक्रम ‘ब्लूमबर्ग इनिशिएटिव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर’ (BICI) या जागतिक पातळीवरील योजनेअंतर्गत राबवण्यात आला. संपूर्ण जगात फक्त १० शहरांची निवड या उपक्रमासाठी झाली असून, भारतातून फक्त पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवड होणं, हे शहरासाठी अभिमानाचं आहे. या माध्यमातून शहरात सायकलस्वारांसाठी अधिक चांगल्या व सुरक्षित सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘स्ट्रीट शेपर’ म्हणजेच ‘रस्त्यांचं रूप ठरवणारे’ म्हणून काम केलं. त्यांनी रस्त्यांचं निरीक्षण केलं, रेखाचित्रं काढली, आपल्या भावना बोलून दाखवल्या आणि त्यामुळेच हा उपक्रम केवळ एक सायकल राईड न राहता, एका विचारप्रवृत्त चर्चेचं रूप घेत गेलं.

महापालिकेच्या ‘१५-मिनिट सिटी’ आणि ‘७५-मिनिट सिटी’ अशा संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा टप्पा होता. यामध्ये शाळा, बाजार, बसस्टॉप आणि मोकळ्या जागा या सर्व सोयी चालत किंवा सायकलवर सहज पोहोचता येतील, अशी रचना केली जाणार आहे.

महापालिकेच्या या यशस्वी आयोजनामध्ये प्रसन्ना देसाई आर्किटेक्ट्स, डिझाईनशाळा, एक्सेपेडल, बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, पेव्हटेक, आणि ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाची साथ दिली.

“मुलांसाठी जर एखादं शहर सुरक्षित असेल, तर ते सर्वांसाठीच सुरक्षित असतं,” असं मत न्यूयॉर्क शहराच्या माजी वाहतूक आयुक्त जॅनेट सॅडिक-खान यांनी यावेळी व्यक्त केलं. “हा उपक्रम म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनातून शहराच्या विकासाची सुरुवात आहे. भविष्यात समावेशक आणि टिकाऊ शहर घडवण्यासाठी अशी पावलं खूप मोलाची ठरतात,” असं GDCI चे प्रोग्राम मॅनेजर जश्वंत तेज कसाला यांनी सांगितलं.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"