फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना मिळणार ४ टक्के सवलत!

ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना मिळणार ४ टक्के सवलत!

पिंपरी, : पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ याकाळात ऑनलाइन भरल्यास मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत मिळणार आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तात्काळ तो भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर ३० जून २०२५ पूर्वी ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्के सवलत महापालिकेच्या वतीने देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ तब्बल ३ लाख ३७ हजार मालतमत्ताधारकांनी घेतला आहे. ज्या मालमत्ताधारकांना या सवलतीचा लाभ घेता आला नाही,त्यांनी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कर ऑनलाइन भरल्यास आता ४ टक्के सवलतीचा लाभ घेता येईल.

viarasmall
viarasmall

ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांची संख्या वाढतेय :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या सहा वर्षातील पहिल्या तिमाहित ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्येवरून ते स्पष्ट होत आहे. आर्थिक वर्ष २०२१- २२ मध्ये १ लाख ११ हजार १, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १ लाख २८ हजार १५ , आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २ लाख ९ हजार ६२५, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २ लाख ६० हजार ७५७ तर आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहित ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या ३ लाख ३७ हजार एवढी आहे.

थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात :- महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत १८ विभागीय कार्यालयांमार्फत आतापर्यंत ३४ हजार ७६९ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या थकबाकीदारांना नोटीस देऊनही पहिल्या तिमाहीत कर भरण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली आहे, अशा मालमत्तांवर कारवाई करण्यास कर संकलन विभागाने सुरुवात केली आहे.

महापालिकेच्या वतीने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मालमत्ता कर भरण्यावर सवलतींची योजना राबवली जात आहे. नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा महापालिकेच्या विश्वासार्हतेचा आणि पारदर्शक कामकाजाचा पुरावा आहे. वेळेत कर भरणाऱ्यांसाठी ही सवलत एक सन्मानच आहे. तथापी थकबाकीदारांवर विलंब दंड आकारणी व जप्ती कारवाई करण्यात येते त्यामुळे थकबाकीदारांनी लवकरात लवकर ऑनलाइन कर भरुन कारवाई टाळावी. – अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"