रावेत येथे इनोव्हा कार पेटवली!

पिंपरी : रावेत येथे रस्त्याकडेला उभ्या केलेल्या इनोव्हा कारची काच फोडून कार पेटवून दिली. ही घटना सोमवारी (दि. ५) पहाटे रावेतमधील गणेश सृष्टी बिल्डींगजवळ घडली.
राघू पांडुरंग गव्हाळे (वय २७, रा. रमाबाईनगर, रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी आपली इनोव्हा कार सोमवारी गणेश सृष्टी बिल्डींगजवळ उभी केली होती. पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने दगडाने कारची काच फोडली आणि कार पेटवून दिली. यामध्ये सात लाख रूपये किमतीची कार आणि त्यातील १५ हजाराची रोकड जळून खाक झाली. फौजदार टार्पेâ तपास करीत आहेत.

भोसरीत सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त!
पिंपरी : विक्री करण्यासाठी घेऊन चाललेला २ लाख ३९ हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई भोसरी प्राधिकरण येथे करण्यात आली. याप्रकरणी दोन जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिओम लक्ष्मण जोगदंड (वय २०) आणि परशुराम प्रदीप ढेपे (दोघे रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सृष्टी टेक्नॉलॉजी येथे हरीओम जोगदंड आणि परशुराम ढेपे यांच्याकडून २ लाख ३९ हजार रुपये किंमतीचा गुटखा व ६ लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा ८ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फौजदार महाडीक तपास करीत आहेत.