मोशीत जेसीबीच्या धडकेत ६ वर्षीय मुलाचा मृत्यू!

पिंपरी : भरधाव वेगातील जेसीबीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.४) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास गोडाऊन चौक, मोशी येथे घडली.
मोशीतील गोडावन चौक परिसरात एका जेसीबी चालकाच्या बेदरकारपणामुळे ६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा प्रकार ४ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता घडला असून गुन्हा त्यानंतर २.५४ वाजता भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. ऋषिकेश जयदेव खराडे (वय ६, रा. मोशी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याबालकाचे नाव आहे. याबाबत त्याच्या ३८ वर्षीय मावशीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राहुल श्रीरामचंद्र यादव (वय २६, रा. मोहननगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असूनपोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या बहिणीचा सहा वर्षीय मुलगा ऋषिकेश हा गोडाऊन चौक, मोशी येथील भाजीवाल्याकडून कोथबिंर आण्यासाठी गेला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या जेसीबीने ऋषिकेश याला जोरात धडक दिली. या धडकेमुळे ऋषिकेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले याबाबत अधिक तपास करीत आहेत.