दापोडीतील पोलिस ठाण्यातील सत्यनारायण पूजेबाबत तक्रार!

पिंपरी : सरकारी कार्यालयात धार्मिक विधी करण्यास मनाई असताना पोलिस आयुक्तालयातील दापोडी पोलिस ठाण्यात २५ एप्रिलला पूजा झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याबाबत नागरी हक्क सुरक्षा समितीने पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडे तक्रार केली आहे.
पोलिस आयुक्तांना निवेदन
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दापोडी पोलिस ठाण्याचे उदघाटन पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याच दिवशी पोलिस ठाण्यात सत्यनारायणाची पूजा केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर टीका होत आहे. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मानव कांबळे म्हणाले, ‘सरकारी कार्यालयात अशा प्रकारचे कुठलेही धार्मिक विधी करणे असंविधानिक आहे. संविधानाचे धर्मनिरपेक्ष स्वरुप टिकविण्यासाठी वाघमारेंवर कारवाईची गरज आहे.’

आमच्या पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभारली आहे. त्याचे उदघाटन २५ एप्रिलला झाले. त्यानिमित्ताने सत्यनारायणाची पूजा झाली होती.-निलेश वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक